top of page
logo.png
home-button.png

तंजावर मराठ्यांचा इतिहास उलगडणार

मुंबई - तंजावर मराठ्यांच्या इतिहासाबाबत महत्त्वाची कागदपत्रे नसल्याने आतापर्यंत त्यांचा इतिहास अप्रकाशित राहिला. मराठा राजघराण्याबाबतची दुर्मीळ आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची कागदपत्रे तमिळनाडू सरकारकडे संग्रहित होती. मोडी लिपीत असलेली ही कागदपत्रे तमीळ विद्यापीठाला सुपूर्त करण्यात आली आहेत. या कागदपत्रांचे डिजिटायझेशन करण्यात येत असून, त्यांची मराठीमध्ये सूची खंड तयार करण्यात येत आहे. त्यानंतर मराठी, इंग्रजी आणि तमीळ भाषांमध्ये अनुवाद करण्यात येणार आहे. त्यातून तंजावरच्या मराठ्यांच्या इतिहासाची पाने पुन्हा उलटली जाणार आहेत.

विद्यापीठ आणि राज्य मराठी विकास संस्थांमध्ये २०१३ मध्ये या कागदपत्रांचे जतन करण्यासाठी करार झाला. पाच लाखांहून अधिक कागदपत्रांचा ठेवा आहे. त्यापैकी तीन लाख ७६ हजार पानांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. ही कागदपत्रे मोडी लिपीत असल्याने विद्यापीठाला त्यांचा अभ्यास करता येत नव्हता. तंजावर ही व्यंकोजीराजे यांची राजधानी होती. व्यंकोजीराव यांचे आताचे वारसदार युवराज शिवाजीराजे भोसले यांनी तमीळ विद्यापीठाकडे असलेली ऐतिहासिक कागदपत्रे महाराष्ट्र सरकारकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. राज्य मराठी विकास संस्थेनेही कागदपत्रांचे जतन आणि संवर्धनाचा निर्णय घेतला. तंजावर मराठा घराण्याचा राज्यकारभार, महसूल, धोरण, भाषा, साहित्य, ऐतिहासिक, खासगी पत्रव्यवहार अशी पाच लाख कागदपत्रे आहेत. या कागदपत्रांची ‘अ’ अतिमहत्त्वाची, ‘ब’ महत्त्वाची, ‘क’ सामान्य कागदपत्रे अशी विभागणी करण्यात आली आहे. त्यापैकी तीन लाख ७६ हजार कागदपत्रांचे डिजिटायझेशन झाले आहे. 

डिजिटायझेशनसाठी जपानी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हे काम तमीळ विद्यापीठात सुरू आहे. या प्रकल्पासाठी तज्ज्ञ समिती नियुक्त करण्यात आली आहे. युवराज शिवाजी भोसले, डॉ. विवेकानंद गोपाळ, डॉ. पांडुरंग बलकवडे, गिरीश मांडके, गणेश नेर्लेकर, कृष्णाजी म्हात्रे आदी सदस्यांचा समितीत समावेश आहे. तीन लाख ७६ हजार कागदपत्रे जतन करण्यात आली आहेत. ही कागदपत्रे त्यांच्या आकारानुसार पाच लाख फ्रेम्स इमेजमध्ये जतन करण्यात आली. या फ्रेम्स हार्ड डिक्‍समध्ये ठेवण्यात आल्या आहेत. उर्वरित दोन लाख १८ हजार ५०० कागदपत्रांचे डिजिटायझेशन सुरू आहे. डिजिटायझेशन झालेल्या मोडी लिपीतील कागदपत्रांचे तज्ज्ञ समितीच्या मार्गदर्शनाखाली मराठी सूची खंड तयार केले जाणार आहे. यासाठी समितीने ६० सहायक प्रतिनिधींची नियुक्ती केली आहे. 

अशी असणार सूची खंड


सूची खंडामध्ये प्रत्येक कागदपत्राचा कालखंड, विषय, संदर्भ असा सारांश देण्यात येणार आहे. या खंडाद्वारे इतिहास अभ्यासकांना प्रत्येक कागदपत्राचा कालखंड कळणार आहे. त्याअधारे तंजावरच्या इतिहासाचा अभ्यास करणे शक्‍य होईल. तंजावरवर १८० राज्यकर्त्यांनी राज्य केले. या प्रत्येक राज्यकर्त्याच्या इतिहासाचे संशोधन करण्यात येणार आहे. 

या प्रकल्पाद्वारे दक्षिणेतील मराठ्यांचा वैभवशाली इतिहास देशासमोर येणार आहे. तमीळ विद्यापीठामुळे महाराष्ट्राला तंजावरच्या मराठ्यांच्या इतिहासाची महत्त्वपूर्ण माहिती मिळणार आहे. ही माहिती इतिहास अभ्यासकांच्या संशोधनात महत्त्वाची भूमिका बजावेल.  


- डॉ. अशोक सोनलकर, प्रकल्पप्रमुख                                                                                                                           उत्कर्षा पाटील

Web Title: Thanjavur Maratha History

2Maratha_15.jpg
bottom of page